अकोला -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तीन दिवसांपासून अकोल्यात दिल्लीचे आरोग्य पथक दाखल झाले आहे. या पथकाने अकोल्यातील आढावा घेतल्यानंतर त्यांनी आज मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. एकीकडे ऑक्सिजनचा साठा कमी असताना आधीपासून बांधण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लँटचे उद्घाटन या पथकाच्या हातून करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरला. दरम्यान या कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील दोन सदस्यीय आरोग्य पथक अकोल्यात दाखल झाले आहे. या पथकाने आल्याबरोबर आपल्या कामाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देवून, अधिकाऱ्यांची बैठक घेत स्वॅब तपासणी प्रयोगशाळेला भेट दिली. कोरोना वॉर्ड, लसीकरण केंद्र, जिल्हा स्त्री रुग्णालय, कंटेमेंट झोनची देखील त्यांनी यावेळी पाहणी केली.