अकोला : येथील दक्षिण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाणेदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात अटक केली. सोबतच एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दोघांनाही अमरावती येथील सीबीआय कोर्टात शनिवारी हजर केले असता न्यायालयाने १४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. तर यातील एक जण हा फरार असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण? : मुकेशकुमार मीना असे लाचखोर ठाणेदाराचे नाव आहे. तर त्याला मदत करणाऱ्या खासगी इसमाचे नाव सुरेश चंदन आहे. तक्रारदाराच्या वडिलाविरूद्ध आरपीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये अटक न करता जामीनावर सोडण्यासाठीचा अभिप्राय न्यायालयात देण्याच्या बदल्यात ठाणेदार मुकेशकुमार मिणा याने तीन लाख रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने नागपूर सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने शनिवारी सापळा रचून मुकेशकुमार याला एक लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तर खासगी इसम सुरेश चंदन यालाही अटक करून या दोघांसह मध्यस्थी करणारा सय्यद मुजमीर अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे अधिकारी या प्रकरणी तपास करीत आहेत.