अकोला - केंद्र, राज्य आणि आयसीएमआर यांची परवानगी न घेताच परस्पर ठाणे येथील इन्फेक्स लॅबौरटरिज येथे कोरोना नमुने पाठवून त्यांचा अहवाल दिल्याप्रकरणी शहरातील डॉ. राम मंत्री आणि ठाणे येथील इन्फेक्स लेबॉरटरिजविरोधात सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या लॅबने जवळपास दोनशेच्यावर चाचणी केल्याची माहिती समोर आली आहे.
विनापरवाना कोरोना स्वॅब टेस्टिंग करणाऱ्या प्रयोगशाळेविरोधात गुन्हा दाखल - akola corona news
या प्रयोगशाळेतून 159 जणांचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह देण्यात आले आहेत. हे तपासणी नमूने ठाण्यातील इन्फेक्स प्रयोगशाळेत पाठवून त्याचे अहवाल देण्यात आले, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख दिली आहे.
शहरातील अमन्खा प्लॉट परिसरात डॉ. राम मंत्री याची प्रयोगशाळा आहे. कोरोना चाचणीची परवानगी नसताना त्यांनी 29 सप्टेंबरपासून तपासणी सुरू केली. खासगी डॉक्टरांना हाताशी धरून त्यांनी अनेकांची कोरोना तपासणी केली. या प्रयोगशाळेतून 159 जणांचे तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह देण्यात आले आहे. तसेच या प्रयोगशाळेमधून शेकडो कोरोना तपासण्या करण्यात आल्याची शक्यताही आहे. हे स्वॅब नमुने ठाण्यातील इन्फेक्स प्रयोगशाळेत पाठवून त्याचे अहवाल देण्यात आले, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख दिली आहे. या प्रकारामुळे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये फरक आढळला आहे. तसेच कोरोनाग्रस्त मृत्यूच्या संख्येमध्ये तफावत होण्याची शक्यता अधिकारी शेख यांनी व्यक्त केली आहे.
हा प्रकार लक्षात येताच डॉ. फारुख शेख यांनी याबाबत चौकशी केली. तसेच जिल्हाधिकारी व संबधित यंत्रणेला याची माहिती दिली. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला.