अकोला - पातुर तालुक्यातील आदिवासी पांढूर्णा गट ग्रामपंचायतीमधील सोनूना गावात किरकोळ कारणावरून येथील काही समाजधुरीणांच्या सांगण्यावरून पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबीयांवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी तब्बल पंधरा दिवसानंतर बहिष्कार टाकल्या प्रकरणी बारा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अद्यापपर्यंत कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज (दि. 24) दिली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात 'ईटीव्ही भारत'ने गावातील ग्राउंड रिपोर्ट दाखविला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस ठाण्यास तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
पातूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत पांढुर्णा येथील सोनूना गावाचे पोलीस पाटील रमेश नारायण कदम, त्यांच्या पत्नी शशिकला रमेश कदम, आई गंगुबाई कदम, मुलगी गोकुळा कदम, रिना कदम आणि मुलगा प्रमोद कदम या सर्वांवर गावाने बहिष्कार टाकला आहे. किराणा, दळण, पाणी पूर्णतः बंद केले आहे. बहिष्कृत पोलीस पाटलाच्या कुटुंबाशी कोणी बोलल्यास दहा रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील पंधरा दिवसांपासून गावातील कुणीही पोलीस पाटलांच्या परिवाराशी बोलत नाही. याबाबत पोलीस पाटील रमेश कदम यांनी चान्नी पोलीस ठाण्यात तीन वेळा तक्रार केली. परंतु, त्यांच्या तक्रारीची एकदाही दखल घेतली नाही. याबाबत ईटीव्ही भारत'ने 23 मे रोजी 'शेतात मंदिर बांधू दिले नाही म्हणून पोलीस पाटील कुटुंबावर ग्रामस्थांचा बहिष्कार' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच चान्नी पोलिसांनी सायंकाळी या प्रकरणी बारा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
चान्नी पोलिसांनी पवन बबन चोंडकर, देवानंद बबन चोंडकर, भारत बबन गिर्हे, अमोल गणेश हांडे, माणिक किसन कदम, दिनकर गणेश कदम, धोंडु सिताराम गिर्हे, दिगंबर साधू चोंडकर, गजानन परशुराम डाखोरे, सुधाकर आत्माराम गिर्हे, संजय किसन चोंडकर, अंकुश भाऊराव चोंडकर या बारा जणांविरोधात भारतीय दंड सहिता कलम 323, 504, 506 आणि 34 सह सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध प्रतिबंध व निवारण) अधिनियम 2016 मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण कलम 5, सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) अधिनियम 2016 मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण कलम 6 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.