अकोला - निवडणूक निःपक्षपातीपणे व पारदर्शक होण्यासाठी उमेदवारांनी आपल्या खर्चावर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. उमेदवारांनी आपल्या खर्चाची मर्याद ७० लाखांपर्यंतच ठेवावी. या मर्यादेचे उल्लंघन केल्यास तो उमेदवारी निवडणुकीतून बाद होऊ शकतो. निवडणुकीत झालेल्या खर्चाचा लेखी तपशील उमेदवाराने सादर करावा, अशा सूचना निवडणूक निरीक्षक नागेंद्र यादव यांनी दिल्या.
निवडणुकीतील खर्चाबाबत अधिकाऱ्यांनी उमेदवारांना सूचना दिल्या
लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक उमेदवारांच्या खर्च विषयक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी ०६ - अकोला लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक नागेंद्र यादव यांच्या उपस्थितीत निवडणूक उमेदवारांचे खर्च विषयक प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या निवडणूक खर्च नोंदवहीमध्ये सर्व निवडणूक खर्चाचे दैनंदीन लेखे ठेवण्यात यावी. तसेच निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांच्या संदर्भात परवानगी घ्यावी. उमेदवार वाहन वापरणार नसेल त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवावे. त्याची परवानगी रद्द करावी अन्यथा त्या वाहनाचा मानिव खर्च लावून त्याची गणना खर्चात करण्यात येईल. या सूचना देण्यात आल्या.
मेळावा, मिरवणूक, सभा घेण्यासाठी परवानगी घेणे व अशा सभांची माहिती सभेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवावी. मेळाव्यासाठी भाड्याने घेतलेल्या वाहनांचा खर्च लेख्यामध्ये समाविष्ठ करणे, निवडणूक भित्तीपत्रके आदी माहिती मुद्रीत करताना प्रकाशक व मुद्रकाचे प्रतिज्ञापत्र घेवून त्यांचे नाव नमूद करणे अनिवार्य आहे. नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर दैनंदीन लेखा, रोख पुस्तक आणि बँक पुस्तक नियमीत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख प्रचारका सोबत हेलिकॅप्टरमधून प्रवास केला तर त्याची खर्चात नोंद घ्यावी लागेल. पक्षाकडून प्राप्त झालेला निधी, स्वत: चा निधी, देणगी, कर्जे, बक्षीसे आदी बाबतचा सर्व तपशिल ठेवावा लागेल. प्रमुख प्रचारकासोबत व्यासपिठावर सहभागी होताना प्रमुख प्रचारकाने उमेदवाराच्या बाजूने मत देण्याचे आवाहन केले, तर अशा बैठकीचा खर्च हा उमेदवारांचा खर्च समजण्यात येईल. पेड न्युज बाबत माहिती करुन घ्यावी. उमेदवाराच्या निवडणूक खर्चात पेड न्युज प्रकरणातील नोंद घेणे आदी बाबतची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी निरीक्षकांचे संपर्क अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, उपजिल्हाधिकारी शिवाजी दावभट, उपजिल्हाधिकारी तसेच खर्च विषयक बाबीचे नोडल ऑफीसर अनिल खंडागळे, जिल्हापरिषदेचे कॅफो संतोष सोनी, जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, अपक्ष उमेदवार मुरलीधर पवार, अरुण ठाकरे, भाजपा उमेदवाराचे प्रतिनिधी अविनाश कुलट, सिध्दार्थ शर्मा, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस उमेदवाराचे प्रतिनिधी चुन्नीलाल अंभोरे, शिवाजीराव देशमुख, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुलताने, हितेश जामनीक तसेच विविध समित्यांचे नोडल ऑफीसर, खर्च विषयक समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.