अकोला - विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या पासेससाठी तासनतास प्रतिक्षा करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास होत आहे. यामुळे लवकर शिबिर घेण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. काल मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक दिलेल्या भेटीत ते बोलत होते.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील प्रतिक्रीया देताना बसस्थानकावर पाणी साचून सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने अस्वच्छता आणि अनियमितता मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. यामुळे प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातचं आता बसच्या पाससाठी विद्यार्थी आणि ज्येष्ठांना तासनतास प्रतिक्षा करावी लागत आहे.
बसस्थानकावर असलेल्या प्रवाशांना आवश्यक त्या सोई सुविधा मिळतात की नाही तसेच पासेससंबंधी असलेल्या अडचणी पाहण्यासाठी अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मध्यवर्ती बसस्थानकाला धडक भेट दिली. पासेससाठी रांगेत ताटकळत उभी असलेली शाळकरी मुलं आणि जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला. या सर्व गोष्टींकडे एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ताबडतोब सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
याबरोबरच विध्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांना लवकरात लवकर पासेस मिळावेत यासाठी शिबिर आयोजित करण्यात येणार असून विध्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे पाटील म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.