अकोला - इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. सामान्य नागरिकांची लुट केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. ही लूट थांबविण्यात यावी, महागाई कमी व्हावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको केला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
'वंचित'ने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला रास्तारोको; इंधन दरवाढ मागे घेण्याची केली मागणी 'दरवाढीकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष' -
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर ही वाढविले आहे. या दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. ही दरवाढ कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. केंद्र सरकार ही याकडे दुर्लक्ष करीत आहे.
'दरवाढ कमी करण्यासाठी दोन्ही सरकार अपयशी' -
दरवाढ कमी करण्यासाठी दोन्ही सरकार अपयशी ठरली आहेत. यासाठी कुठल्याही उपाययोजना सरकारकडून करण्यात आलेल्या नाही आहेत. परिणामी, याचा भुर्दंड बसत आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. घरगुती गॅस दरवाढ ही मागे घ्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या अखत्यारीत असलेल्या अधिकारांचा वापर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
..हे होते उपस्थित
वंचित बहुजन आघाडीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वाखाली अशोक वाटिका येथून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर त्यांनी रस्त्यावर रास्तारोको केला. युवक आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, शहराध्यक्ष शंकरराव इंगळे, वंदना वासनिक आदी उपस्थित होते.