अकोला - आयुष्याचा गाडा ओढताना गोरगरीब, अपंगांना मिळेल आणि जमेल ते काम करावे लागत असते. मात्र, अशा विपरीत परिस्थितीतही समाजासाठी आदर्श निर्माण करणारे अनेक आहेत. अशाच प्रकारचा आदर्श येथील एका अंध पती-पत्नी यांनी भिक न मागता स्वाभिमानाने आपल्याजवळ असलेली कला जोपासत ठेवला आहे.
शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अंध ढोलक वादक साहेबराव पातोडे आणि त्यांची अंध हार्मोनियम वादक पत्नी आम्रपाली पातोडे हे कुणासमोरही हात न पसरविता गाणी गात स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची करमणूक करतात. यामधून मिळणार्या पैशातून ते आपल्या दोन मुलांच्या शिक्षणाचा व पालनपोषणाचा खर्च भागवत आहेत. याप्रकारे ते आपला चरितार्थ चालवितात.
दोघे अंध पती-पत्नी स्वतः विविध चित्रपटामधील गाणी, भावगीते, भक्तिगीते आणि भीम गीते गाऊन प्रवाशांचे मनोरंजन करतात. यामुळे बसेसच्या कर्कश आवाजापेक्षा मधुर संगीताचा आणि वाद्याचा आवाज प्रवाशांच्या मनाला आनंद देतो.