अकोला - राज्यातील आघाडी सरकारने अनलॉक पाचमध्ये अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी, मंदिरे मात्र उघडलेली नाहीत. या सरकारने ही मंदिरे उघडावी व मनःशांतीसाठी तसेच भक्तीसाठी नागरिकांना वाट मोकळी करून द्यावी, या मागणीसाठी भाजपाच्या अध्यात्मिक विभागातर्फे 'उद्धवा दार उघड' अशा घोषणा देऊन अकोल्याचे आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिरासमोर आज (मंगळवार) उपोषण करण्यात आले.
सरकारला महसूल मिळावा म्हणून आघाडी सरकारने मद्यपींसाठी दारूची दुकाने उघडली. परंतु भक्तांसाठी मंदिरे उघडले नाहीत. हे सरकार भक्तांच्या विरोधात असून मद्यपींच्या पाठीशी आहे, हे यावरून सिद्ध होत आहे. विविध उद्योग सुरू करण्यात येत असले तरी, मंदिरे उघडण्यासाठी सरकार का सकारात्मक नाही, ही चिंतनाची बाब आहे. आघाडी सरकारची ही भूमिका 33 कोटी देवतांच्या भक्तांचा विश्वास मोडण्याचा हा प्रकार करीत आहे. आघाडी सरकारला हे भक्त कधीच माफ करणार नाही, अशी टीका आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.