महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाविकास आघाडीचा निषेध, भाजप राज्यात 400 ठिकाणी करणार धरणे आंदोलन - आमदार डॉ. संजय कुटे

महाविकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी विविध घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, अवकाळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करणे, अशा विविध घोषणा केल्या होत्या. पण, यातील एकाही घोषणेची पूर्तता न केल्याने तसेच या सरकारच्या काळा महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याच्या निषेधार्थ भाजप राज्यात 400 ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिली.

आमदार डॉ. संजय कुटे
आमदार डॉ. संजय कुटे

By

Published : Feb 22, 2020, 11:18 PM IST

अकोला- जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे व प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात 400 ठिकाणी असे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

बोलताना आमदार डॉ. संजय कुटे

पुढे ते म्हणाले, सरकार स्थापन करत असताना सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण, महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू, अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करीत आहे, असे आमदार संजय कुटे म्हणाले.

गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजप तीव्र निषेध करीत आहे, असेही आमदार संजय कुटे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महापौर अर्चना मसने, माजी महापौर व महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, उपमहापौर राजेंद्र गिरी, संजय जीरापुरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा -तुषार पुंडकर हत्येप्रकरणी हुंडी चिठ्ठी अन् खदान व्यावसायिकांवर पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला संशय

ABOUT THE AUTHOR

...view details