अकोला -जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे तत्काळ सर्व्हे करावे, या मागणीसाठी भाजपा आमदाराच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने भाजपा आमदारांनी रोष व्यक्त केला. तसेच यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात 'ठिय्या आंदोलन' -
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतातील पीक खरडून गेले आहे. नागरिकांच्या घराचे नुकसान झालेले असताना, जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तातडीने नुकसानीचा सर्व्हे करण्याचे आदेश देणे गरजेचे होते. तसेच अशा कठीण परिस्थितीत मुख्यालय सोडून जाणे योग्य नव्हते. यामुळे भाजप आमदार चिडले. त्यांनी जिल्हाधिकारी निमा आरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांना फोन लावून त्यांना सर्व परिस्थिती अवगत केली. तसेच याबाबत सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे, असे सांगितले. त्यासोबत आमचे म्हणणे काय आहे, यासाठी बैठक घेऊन आपण निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार सावरकर यांनी केली. परंतु, या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. यामुळे चिडलेल्या आमदार गोवर्धन शर्मा, आमदार सावरकर यांनी पदाधिकारी, नगरसेवक यांना सोबत घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. परंतु, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी त्यांची समजूत काढली. परंतु, भाजप आमदार काहीही ऐकण्यास तयार नव्हते. यावेळी महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही बोलाविण्यात आले होते. त्याचीही आमदारांनी चांगलीच खरडपट्टी काढली.
हेही वाचा - Konkan Rain : यंत्रणांनी सतर्क राहून बचावकार्य करावे; पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा