अकोला MLA Govardhan Sharma Funeral :भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांच्यावर अन्नपूर्णा माता मंदिराजवळ शासकीय इतमामात आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांनी त्यांच्या पार्थिवाला चिताग्नी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली. तसेच यावेळी सर्वच राजकीय पक्षाचे जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : अकोला पश्चिममधून सहा वेळा भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे त्यांच्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील तसेच भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या मृत्यूमुळे भाजपमधील सर्वसामान्यांमध्ये राहणारा नेता हरपला. दरम्यान, त्यांचे पार्थिव सकाळी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे पदाधिकारी, इतर राजकीय पक्षाचे नेते यांनी त्यांचे शेवटचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांना सलामी दिली.
पाचही जिल्ह्यातील नेते होते उपस्थित: यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाचही जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार यासह वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही यावेळी उपस्थित होते. साश्रूनयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी शर्मा यांच्या पार्थिवाला पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली. आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, आकाश फुंडकर, राजेंद्र पाटणी, वसंत खंडेलवाल, आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक संदीप घुगे व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गोवर्धन शर्मा हे लोकांमध्ये सहज मिसळून त्यांचे सुखदु:ख जाणून घेणारे, अडचणीला तत्काळ धावून जाणारे, तसेच राजकारणात विरळा व नि:स्पृह व्यक्तिमत्व होते. ते खऱ्याअर्थाने जनसामान्यांचे नेते होते. फडणवीस यांनी आज अकोला येथील गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच यांनी शर्मा यांचं कुटुंबीय गंगादेवी शर्मा, कृष्णा शर्मा, अनुप शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केलं. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री