अकोला - पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले. तसचे जिल्हाधिकारी कार्यालय चौकात रास्तारोको आंदोलन करून सरकारचा निषेधही करण्यात आला. मात्र यावेळी आंदोलकांनी कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचा प्रकार समोर आला.
आमदारांच्या निलंबनानंतर भाजपा आक्रमक विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन मंगळवारी संपले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपाने सभागृहात गोंधळ घातला.तसेच सभागृहाच्या दालनात उतरूवन तालिका अध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांच्याबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे सभागृहाच्या नियमान्वये गदारोळ करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. या 12 आमदारांपैकी एक आमदार हे मूर्तिजापूर मतदार संघातील हरीश पिंपळे आहेत.
अकोल्यात कोरोना नियम धाब्याबर बसवत आंदोलन आमदारांच्या निलंबनानंतर आक्रमक झालेल्या भाजपाच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे अकोला येथे जिल्ह्याधिकारी कार्यालय परिसरात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौकात रास्तारोको करीत राज्य सरकार विरोधात नारेबाजी केली. त्यासोबतच भास्कर जाधव यांच्याविरोधात निदर्शने केली. राज्य सरकारने केलेली ही निलंबनाची कारवाई आकसापोटी केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
हा रास्तारोको शहराध्यक्ष विजय अग्रवाल आणि महापौर अर्चना मसने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. दरम्यान, या रास्तारोकोमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. परंतु, पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली.
कोरोनाच्या नियमांची पायमल्ली-
राज्यात व जिल्ह्यात अद्याप कोरोनाचे सावट संपलेले नाही, त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र भाजपाच्या आंदोलकांना कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायोजनांचे भान नसल्याचे या आंदोलनावेळी दिसून आले. भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हते. त्यासोबत कोणीही सोशल डिस्टनसिंग पाळले नाही.