अकोला -जिल्हा परिषदेत सभापती पदांच्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाने वर्चस्व कायम ठेवत चारही सभापतिपदे काबीज केले. यासंबंधिची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. निवडणुकीदरम्यान भाजपचे सदस्य अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा कमी झाला. त्यामुळे भारिपने या निवडणुकीत 25 विरुद्ध 21 मतांनी विजय मिळविला.
जिल्हा परिषदेच्या चारही सभापतिपदांवर भारिपचे वर्चस्व; भाजप गैरहजर - अकोला जिल्हा परिषद समित्या सभापती
मतदानादरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या 21 सदस्यांनी, तर भारिप-बहुजन महासंघाच्या 25 सदस्यांनी मतदान केले. यावेळी भाजपचे सदस्य गैरहजर होते. त्याचा फायदा भारिपला झाला. मतदानानंतर विजयी उमेदवारांचे नाव जाहीर करताच भारिपच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी दुपारी एक वाजेपर्यंत भारिपच्या वतीने महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी मनीषा बोर्डे, समाज कल्याण सभापती पदासाठी आकाश शिरसाट व दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी पंजाबराव वडाळ व चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महाविकास आघाडीकडून महिला व बालकल्याण सभापती पदासाठी काँग्रेसच्या अर्चना राऊत, समाज कल्याण सभापती पदासाठी शिवसेनेच्या डॉ. प्रशांत आढावू व विषय समिती सभापती पदांसाठी राष्ट्रवादीच्या सुमन गावंडे व अपक्ष गजानन फुंडकर यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रक्रियेअंतर्गत दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी अकोला डॉ. निलेश अपार यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली.
मतदानादरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या 21 सदस्यांनी मतदान केले, तर भारिप-बहुजन महासंघाच्या 25 सदस्यांनी मतदान केले. मतदानानंतर विजयी उमेदवारांचे नाव जाहीर करताच भारिपच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जिल्हा परिषदेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.