अकोला- कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सहा हजार 420 विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात धडक दिली. यावेळी कृषी तंत्र निकेतनचे अधिष्ठाता त्यासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासोबत या विद्यार्थ्यांनी चर्चा केली.
कृषी तंत्र निकेतन सण 2018-2021 च्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बेसवर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, तेही पदवीला प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या शिक्षणाला खंड लागणार आहे.
विद्यार्थ्यांना भ्रमात ठेवून प्रवेश!
2017-2020 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम पूर्ण करून कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या व पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व सन 2018-2021 च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा समान आहे. तरीसुद्धा 2018-2021 या बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात येत आहे. दरम्यान, प्रवेश माहिती पुस्तकामध्ये कृषी पदवीच्या थेट पहिल्या व दुसऱ्या वर्षात प्रवेश नसल्याची माहिती असली तरी काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका देत नाही. विद्यार्थ्यांना भ्रमात ठेवून प्रवेश करून घेत आहेत.