अकोला -‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हणतात. पण आज या पूर्णब्रह्मालाही कृतज्ञता वाटावी, अशी प्रचिती देणारे औचित्य पालकमंत्री बच्चू कडू यांनी साधले. निमित्त होते शहिद कुटुंबियांसमवेत स्नेह भोजनाचे. त्यांचे वारस, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, पुत्र, कन्या यांच्या ‘वदनी’ गेलेला हा पूर्णब्रह्माचा ‘कवळ’ स्वतःलाच धन्य मानत होते.
शहिदांच्या कुटुंबियांच्या विषयावर प्राधान्याने काम सुरू -
स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हूतात्मांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले. त्यात स्वतः पालकमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या हातांनी जेवण वाढले. जिल्हाधिकारी, प्रशासनातले इतर अधिकारीही वाढपी झाले. थाटामाटात म्हणावा असा हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. खरंतर शहिदांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची ही एक संधी होती. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचे हे औचित्य अधिक औचित्यपूर्ण झाले. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शहिदांच्या कुटुंबियांच्या विषयावर प्राधान्याने काम करीत आहेत. त्यांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत ते अधिक जागरुक आहेत. प्रशासनातल्या प्रत्येकाने असे जागरुक असावे, याबद्दलही ते आग्रही आहेत. यासाठी जिल्ह्यातील २८ शहिद कुटुंबियांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी त्यांनी घेतल्या. त्यांची अडीअडचण जाणून घेतली. त्यापैकी अनेकांचे प्रश्न मार्गीही लागले.