अकोला - कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील रिक्षांची चाके थांबली आहेत. अशा परिस्थितीमध्ये रिक्षा चालक-मालक यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. चालक-मालक यांच्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राज्यभर महाराष्ट्र असंघटित कामगार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
राज्य शासनाने गेल्या 5 जूनपासून राज्यात अनलॉक प्रक्रिया हळूहळू सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेत रिक्षा चालक आणि मालकंचा विचार करण्यात आला नाही. त्यातच रिक्षा चालकांसाठी प्रवासी वाहतूक करण्यासाठी जाचक अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस प्रतिबंध झाला असला तरीही रिक्षा चालकांच्या संसाराचे गाडा चालविण्यासाठीसुध्दा प्रतिबंध लागला आहे. आधीच बेरोजगार असलेल्या रिक्षा चालकांनी जमीन विक्री करून किंवा बँक कर्ज काढून रिक्षा खरेदी केली आहे.