अकोला- दिवाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैधरित्या फटाके विक्री होत असते. त्यामुळे परवाना घेवून फटाके विक्री करणाऱ्याचे मोठे नुकसान होत असले तरी अनधिकृतपणे फटाके विक्री ही धोकादायक आणि गंभीर बाब आहे. त्यामुळे अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्याना प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी किरकोळ फटाके विक्रेता संघाचे शाम महाजन यांनी यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संजय कावळे, राजू ठाकूर, हरीश जांभेकर, मो. आरिफ हे उपस्थित होते. महाजन म्हणाले, 30 वर्षांपासून फटाके विक्रेता संघ शासनास फटाके विक्रीतून महसूल मिळवून देत आहे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून ही विक्री केली जाते. येथील अकोला क्रिकेट क्लब येथे फटाक्यांची दुकाने थाटल्या जातात. यावेळी कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्याच्यादृष्टीने फटका विक्री करताना आवश्यक ती काळजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक दुकानात सॅनिटायझरचा उपयोग केला जाईल, तसेच ग्राहकांना मास्क वापरणे अनिवार्य असेल, सामाजिक अंतरही ठेवण्यासाठी तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. शहरातील फटाके विक्री ही लवकर संघातर्फे सुरू होणार असली तरी या नियमाचे पालन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
लाखो रुपयांचे होते नुकसान
अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्यांमुळे दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे संजय कावळे यांनी सांगितले.