अकोला - सुमारे ३५ बैलांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्याला पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने हिवरखेड येथे आज ताब्यात घेतले. हे कत्तलीसाठी नेण्यात येणारे सर्व बैलं सुमारे चार लाख ३० हजार रुपये किंमतीचे आहेत. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, हे प्रकरण हिवरखेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील देडतलाई येथून आणले होते बैलं
विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना हिवरखेड परिसरात कत्तलीसाठी बैलं नेण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. या माहितीवरून विशेष पथकाने येथील स्मशानभूमीच्या बाजूने जनावरांना शेख राजीक शेख अकिल घेऊन जात असताना दिसला. दरम्यान, यामधील सर्व बैलांच्या मालकी हक्काबाबत त्याला विचारले असता, त्याच्याकडे काहीही पुरावा मिळाला नाही. तसेच या बैलांबाबत त्याला माहिती विचारली असता, त्याने हे बैलं मध्यप्रदेशातील देडतलाई येथून आणले आहेत. आता हे सर्व बैलं कत्तलीसाठी जंगलामार्गे हिवरखेडला घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. यावर तपास करणाऱ्या विशेष पथकाने सर्व बैलांची संख्या ३५ असून, त्यांची किंमत किमान चार लाख ३० हजार असल्याची माहिती दिली. दरम्यान सर्व बैलांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 'आदर्श गोसेवा संस्थान अकोट' या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. आरोपी शेख राजीक शेख अकिल याच्यावर हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांनी घेतली हायकोर्टाच्या न्यायाधीशांची भेट