अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहातील कर्मचार्यांनी मृतदेहाची अवहेलना केल्याचा आरोप एका मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याचबरोबर, मृतदेह बांधण्यासाठी 500 रुपयांची मागणी केल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे, संतप्त नातेवाईकांनी जीएमसीच्या अधिष्ठातांच्या कक्षासमोरच मृतदेह आणून ठेवला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -छत्तीसगडच्या दोन बहिणींची धावत्या रेल्वेतून आत्महत्या; अकोला जिल्ह्यात घटना
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अविनाश काळे या युवकाचा विष प्राशन करून मृत्यू झाला होता. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह अकोल्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधला जातो. मात्र, प्लास्टिकमध्ये न बांधता चादरमध्ये गुंडाळून दिल्याने नातेवाईक संतप्त झाले. त्यामुळे, नातेवाईकांनी मृतदेह थेट अधिष्ठाता कार्यालयात आणून ठेवला.
मृतदेह बांधण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी शवविच्छेदन गृहातील कर्मचार्यांनी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृतदेह अधिष्ठाता कार्यालयात घेऊन जात असताना येथील कर्मचारी आणि नातेवाईकांमध्येही वाद झाला. काही वेळानंतर वाद मिटल्याने नातेवाईक मृतदेह परत घेऊन गेले. दरम्यान, यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.
कर्मचारी व नातेवाईकांमध्ये वाद :संतप्त नातेवाईक हे मृतदेह अधिष्ठाता यांच्या कक्षासमोर घेऊन जात असताना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी नातेवाईकांना हटकले. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. शेवटी नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकांना बाजूला सारून मृतदेह अधिष्ठातांच्या कक्षासमोरच ठेवला.
वैद्यकीय अधिकार्यांनी काढली समजूत :दुपारपर्यंत हा प्रकार सुरू होता. शेवटी अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिकार्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आश्वासन दिले. त्यासोबतच संतप्त नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर नातेवाईकांनी अविनाश काळे यांचा मृतदेह नेला.
हेही वाचा -Water Issue in Akola : पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून महिलांनी केला आयुक्तांची गाडी अडवण्याचा प्रयत्न