अकोला- अकोट तालुक्यातील धारूड या गावातील रस्त्यांमधून सरपटत जात असलेला मांडूळ जातीचा साप अकोट ग्रामीण पोलिसांनी आज (दि. 28 डिसें.) दुपारी नागरिकांकडून जप्त करत तो वनविभागाच्या ताब्यात दिला. साप दुर्मीळ असून त्याची तस्करी करून कोट्यवधीमध्ये विक्री होत असते.
पोपटखेड गावाजवळ असलेल्या धारूड गावात अतिदुर्मीळ मांडूळ जातीचा साप सरपटत जात असताना नागरिकांना तो दिसला. या सापाला पाहण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी झाली होती. तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी अकोट ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून नागरिकांजवळ असलेल्या या सापाला ताब्यात घेतले. त्यानंतर हा साप वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला.