महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 9, 2020, 9:02 AM IST

ETV Bharat / state

'व्हीआरडीएल लॅब'ला दिल्लीकडून मान्यता प्राप्त; लवकरच होणार गुणवत्ता चाचणी

कोरोना विषाणू चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न व्हीआरडीएल प्रयोगशाळा (लॅब) उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा आता नमुने तपासणीसाठी सज्ज आहे. या प्रयोगशाळेला आय.सी.एम. आर नवी दिल्ली या संस्थेने अहवालास मान्यता दिली आहे. आता यानंतर लगेचच गुणवत्ता चाचणीची प्रक्रिया पार करावी लागेल

'व्हीआरडीएल लॅब'ला दिल्लीकडून मान्यता प्राप्त
'व्हीआरडीएल लॅब'ला दिल्लीकडून मान्यता प्राप्त

अकोला - कोरोना विषाणू चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न व्हीआरडीएल प्रयोगशाळा (लॅब) उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा आता नमुने तपासणीसाठी सज्ज आहे. या प्रयोगशाळेला आय.सी.एम. आर नवी दिल्ली या संस्थेने अहवालास मान्यता दिली आहे. आता यानंतर लगेचच गुणवत्ता चाचणीची प्रक्रिया पार करावी लागेल, त्यानंतरच प्रत्यक्ष चाचणीची परवानगी मिळेल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले.

आय.सी.एम.आर या संस्थेतर्फे या प्रयोगशाळा उभारणीसाठी ५० लक्ष रुपये बांधकाम व अन्य स्थापत्य कामांसाठी तसेच ९३ लक्ष रुपये यंत्रसामग्री, आवश्यक रसायने, किट्स, उपकरणे व फर्निचर यासाठी मंजूर करण्यात आले. या प्रयोगशाळेत बायोसेफ्टी कॅबिनेट, लॅमिनर एअर फ़्लो, ऑटोमॅटिक सेंट्रिफ्युगर, डीप फ्रिजर इ. आवश्यक साहित्यही बसवण्यात आले आहे.

कोरोना विषाणू चाचणीच्या अनुषंगाने आवश्यक असलेले आरटीपीसीआर हे मशिन आयसीएमआर या संस्थेतर्फे 24 मार्चला प्राप्त झाले आहे. प्रयोगशाळेसाठी लागणारे अनुषंगिक यंत्रे, उपकरणे, रसायनेदेखील प्राप्त झाली आहेत. आता ही प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी सज्ज आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील एक सहाय्यक प्राध्यापक, दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे प्रशिक्षण ही देण्यात आले आहे. याशिवाय प्रयोगशाळेत कामासाठी आवश्यक रिसर्च सायंटिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदेही नव्याने भरती करण्यात आली आहेत.

प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रयोगशाळेला मान्यता मिळवणे याबाबतचा अहवाल आय.सी.एम. आर नवी दिल्ली या संस्थेकडे मंगळवारी पाठविण्यात आला. त्या अहवालाला मान्यता मिळाली आहे. त्यानंतर आवश्यक प्रायमर, प्रोबस, किट्स पाठविण्यात येतील. त्यानंतर प्रयोगशाळेची गुणवत्ता चाचणी होईल. गुणवत्ता चाचणीच्या मानकनाद्वारे गुणवत्ता सिद्ध झाल्यास लगेचच या प्रयोगशाळेस विषाणू चाचणीची परवानगी मिळेल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.अपूर्व पावडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details