अकोला - कोविडच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील दीड वर्षापासून शाळांची घंटा नियमितपणे वाजली नाही. बहुतांश शाळा सुरूच झाल्या नाहीत. विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा पर्याय पुढे आणला. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत सुरू रहावे म्हणून तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळेने विद्यार्थ्यांसाठी 'ज्ञानाहार रेस्टॉरंट' ही नाविन्यपूर्ण संकल्पना सुरू केली आहे.
खंडाळा शाळेने उघडले ज्ञानाहार रेस्टॉरंट; ऑनलाइन शिक्षणाला शिक्षकांनी दिला रुचकर पर्याय
रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रोण, पत्रावळी, कागदी प्लेटवर विविध विषयांचे लेखन करून विद्यार्थ्यांना ते अभ्यासासाठी पुरवले जाते. इयत्ता पहिली ते सातवीच्या अभ्यासाचे लेखन या साहित्यावर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास हा जेवण आणि नाश्ताच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला जात आहे. या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची गोडी लागली आहे.
कोरोनामुळे सध्या बहुतांश शाळा बंद आहेत, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारच्या विचारधिन होता. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे त्या निर्णयावरही सावट आले. मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून खंडाळा जिल्हा परिषद शाळेने येथील विद्यार्थ्यांना घराजवळ शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शाळा बंद असल्याने ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी शिक्षकांनी हा उपक्रम राबविला आहे. रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रोण, पत्रावळी, कागदी प्लेटवर विविध विषयांचे लेखन करून विद्यार्थ्यांना ते अभ्यासासाठी पुरवले जाते. इयत्ता पहिली ते सातवीच्या अभ्यासाचे लेखन या साहित्यावर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास हा जेवण आणि नाश्ताच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला जात आहे. या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची गोडी लागली आहे.
ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात असंख्य अडथळे येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी शाळेच्या वतीने आतापर्यंत रेडिओ खंडाळा, स्वाध्यायमाला, निसर्गयात्रा, ऑनलाईन टेस्ट, मोहल्ला शाळा असे उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राबविले. ज्ञानाहार रेस्टॉरंट तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ सदस्य दिनकर धूळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. तेथून विद्यार्थी ज्ञानाहार घेऊन घरी अभ्यास करतात. पुस्तकातील आशय, स्वाध्याय पत्रावळीवर लेखन करून शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने अभ्यासाची आवड विद्यार्थ्यांमध्ये या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न या शिक्षकांनी केला आहे. गणितीय क्रिया, भाषा व्याकरण, इंग्रजी, विज्ञान, भौगोलिक माहिती, इतिहास विषयासंबंधी सोप्याकडून कठीणकडे जाणाऱ्या स्वाध्याय कृती ज्ञानाहार रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासह अभ्यासपूरक वाचनीय पुस्तके येथे ठेवण्यात आली आहेत. ज्याचा उपयोग गृहकार्य करण्यासाठी विद्यार्थी आवडीने करीत आहेत.