अकोला - जिल्हा परिषदेवर सलग पाचव्यांदा भारिप बहुजन महासंघाने आपली सत्ता कायम ठेवली आहे. अकोला जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रतिभा भोजने यांची, तर उपाध्यक्षपदी सावित्री राठोड यांची निवड झाली.
अकोला जिल्हा परिषदेत महिलाराज; भारिप बहुजन महासंघ पाचव्यांदा सत्तेवर - अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष निवड
अकोला जिल्हा परिषदेवर सलग पाचव्यांदा भारिप बहुजन महासंघाने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अध्यक्षपदी प्रतिभा भोजने यांची, तर उपाध्यक्षपदी सावित्री राठोड यांची निवड झाली.
महाविकास आघाडीला भाजपने साथ दिल्याची चर्चा सभा सुरू होण्यापूर्वी रंगली होती. मात्र, सभा सुरू झाल्यानंतर भाजपचे सातही सदस्य सभागृहाबाहेर पडल्याने भारिपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. भारिप बहुजन महासंघाकडे 25 सदस्य, तर महाविकास आघाडीकडे 21 सदस्य होते.
हेही वाचा - युवा आमदारांशी संवाद: 'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'
भारिप बहुजन महासंघाकडून अध्यक्षपदासाठी प्रतिभा भोजने (भांबेरी सर्कल) यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी सावित्री राठोड (चोंढी सर्कल) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या गोपाल दातकर यांनी अध्यक्षपदासाठी, तर काँग्रेसच्या सुनील धाबेकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता.