अकोला -राज्य सरकारने लावलेल्या मिनी लॉकडाऊनविरोधात व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. नेकलेस रोड येथे व्यापाऱ्यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीनंतर व्यापाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये संचारबंदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर राज्य शासनाने संचारबंदी रद्द केली नाही, तर व्यापारी स्वतःहून दुकाने उघडतील, असा इशारा देखील व्यापाऱ्यांनी यावेळी दिला आहे.
राज्य सरकारने सुरुवातीला दोन दिवसांसाठी संचारबंदीचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर संचारबंदी अधिक तीव्र करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवा वगळून, सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अकोल्यातील व्यापारी गेल्या दोन-तीन दिवसांपासून रोज सकाळी आपल्या दुकानासमोर येतात, उभे राहतात आणि परत घरी निघू जात आहेत. या संचारबंदीमुळे आमचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून, संचारबंदीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.