अकोला - नातीवर अत्याचार करणाऱ्या पणजोबाला पोक्सोच्या विशेष न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना 10 नोव्हेंबर 2018ची असून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या परिसरातील आहे. ही नात साडेतीन वर्षाची असून नराधम पणजोबा यादवराव अर्जुनराव डोंगरे हा घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून कारागृहात आहे. तसेच विशेष न्यायालयाने तीन लाखांचा दंड ठोठावला असून दीड लाख रुपये पीडित नातीला देण्याचे आदेश ही दिले आहे.
घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून पणजोबा कारागृहात
फिर्यादी व आरोपीची मुलगी हे जवळजवळ राहतात. फिर्यादी या साडेतीन वर्षाच्या नातीला घरी ठेवून 10 नोव्हेंबर 2018 रोजी नेहमीप्रमाणे कामाला गेल्या होत्या. त्यानंतर आरोपी हा त्या नातीला भेटला. तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादी या घरी आल्यानंतर ती पीडित मुलगी रडत होती. तिने आजीला गुप्तांग दुखत असल्याचे आजीला सांगितले. आजीने तिला विचारले तर तिने डोंगरे आबा आले होते, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी चिमुकली मुलीकडे पाहिले. तिची परिस्थिती योग्य नसल्याने त्यांनी थेट सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन गाठले. ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी यादवराव अर्जुनराव डोंगरे (वय 72 वर्ष, रा. आसरा, ता. भातकुली, जिल्हा अमरावती) यास 376 (2), (एफ) आणि पोक्सो 4, 5 नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी यादवराव डोंगरे यास अटक केली. तेव्हापासून आरोपी हा जिल्हा कारागृहात बंद आहे.