अकोला- जिल्ह्यातील गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात बलात्कारानंतर करण्यात आलेल्या हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्बल ११ वर्षांनंतर सुरु झाली आहे. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या समोर ही सुनावणी चालू आहे. मंगळवारी या हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.
या हत्याकांडात तरुण आणि तरुणीला बांधून ठेवून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर दोघांची हत्या करण्यात आली होती. राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चीत हत्यांकांडांची सुनावणी आता सुरु झाली आहे. जुने शहरातील रहिवासी असेलेले हे दोघे शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात १४ जून २००८ रोजी दुचाकीने जात होते. त्यावेळी १३ जणांच्या टोळक्याने तरुणाला दोराने बांधून ठेवत तीच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर दोघांचीही हत्या केली.
आरोपींनी त्यानंतर दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर टाकून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा बनाव केला होता. यामधील हुसेन खा सुजात खाने याने दोघे आत्महत्या करीत असल्याची खोटी सुसाईड नोटही तयार केली होती. याप्रकरणी उरळ पोलिसांनी १३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँन्ड यांच्या न्यायालयात सुरु झाली असून मंगळवारी मुख्य साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली.