अकोला - राज्यामध्ये सध्या संचारबंदी लागू आहे. संचारबंदीमध्ये जीवनावश्यक वस्तू बघळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद आहेत. परंतु, जीवनावश्यक वस्तूच्या नावावर खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांवर अद्यापपर्यंतही शहर वाहतूक शाखा किंवा पोलीस बंदोबस्त लावू शकलेले नाहीत. तसेच ट्रिपल सीट जाणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. मात्र, आज शहर वाहतूक शाखेने विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करीत संचारबंदी असल्याचे आपल्या कर्तव्यातून दाखवून दिले. जवळपास 200 वाहन चालकांवर ही कारवाई केली. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे कि, नाही असा प्रश्नही निर्माण झाला होता.
सध्या देशभरात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्तिथीत शासनाने लॉक डाऊनचे आदेश दिले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेचे कारण देऊन अनेक लोक बाहेर फिरत आहेत. अशांवर लगाम घालण्यासाठी अकोला शहराच्या वाहतूक पोलिसांनी गाड्यांची तपासणी करून चौकशी सुरू केली आहे.