अकोला - जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हरविलेले आणि चोरी गेलेले मोबाईल, वाहने यासह चोरीचे दागिने, असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आज संबंधितांना परत केला.
यामध्ये 67 वाहने, 122 मोबाईल, 19 लाख रुपयांचे चोरीचे साहित्य असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला. एकत्र या वस्तू परत देण्याचा कार्यक्रम आज सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये राबविण्यात आला.
मोबाईल चोरी जाणे किंवा हरविणे यासह दुचाकी चोरीच्या घटना, वाहने चोरी जाण्याच्या घटना त्यासोबतच घर आणि दुकानांमधून दागिने व रोख रक्कम चोरीला जाण्याच्या घटनांमधील हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यातून तक्रारदारांना परत करण्यात आला.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून मोबाईल चोरी आणि हरवलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यासोबतच सर्वच पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी यांना यासाठी नियुक्त केले होते.
त्यानुसार जिल्ह्यात 122 मोबाईल सायबर सेलला शोधण्यात यश आले. जप्त केलेली 67 चोरीचे वाहने तसेच चोरीला गेलेले दागिने संबंधितांकडे न्यायालयाच्या आदेशानुसार सोपविण्यात आली. ही एकत्र मोहीम जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये राबविण्यात आली. त्यामुळे तक्रारदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.