अकोला -वैद्यकीय अधिकारी वर्गाच्या निवास स्थानांमध्ये राहणाऱ्या तीन परिचारिकांना निवासस्थान खाली करण्याचे आदेश वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी दिले होते. याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केल्यानंतर घोरपडे यांनी आज आपला आदेश रद्द करीत परिचारिकांना निवास्थानी परत जाण्यास सांगितले आहे.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: परिचारिकांना निवासस्थान खाली करण्याचा आदेश अधिष्ठातांकडून रद्द
अकोला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी खोडसाळपणा करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवास स्थानामध्ये राहणाऱ्या मनीषा इंगोले, ममता शाह, चंदा भागवत या तीन परिचारिकांना दोन दिवसांच्या आत निवासस्थान खाली करण्याचे आदेश दिले होते.
सध्या कोरोना विषाणूमुळे हाहाकार उडाला आहे. अशा अवस्थेत वैद्यकीय सेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना कर्तव्यावर हजर रहावे लागत आहे. अशी भयंकर परिस्थिती असतानाही अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी खोडसाळपणा करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवास स्थानामध्ये राहणाऱ्या मनीषा इंगोले, ममता शाह, चंदा भागवत या तीन परिचारिकांना दोन दिवसांच्या आत निवासस्थान खाली करण्याचे आदेश दिले होते. कोरोना पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हे निवासस्थान देण्यात येणार असल्याचे नोटिशीमध्ये म्हटले होते.
साथीच्या आजारांमध्ये परिचारिकांना हेतूपुरस्सरपणे त्रास दिला जात असल्याचा आरोप या तिन्ही परिचारिकांनी केला होता. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी तिन्ही परिचारिकांना दिलेले निवासस्थान खाली करण्याचे आदेश लेखी पत्राद्वारे रद्द केले. त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या या परिचारिकांना दिलासा मिळाला असून त्यांनी 'ईटीव्ही भारत'चे आभार मानले आहेत.