अकोला :कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 23 फेब्रुवारीपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले होते. सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी प्रतिष्ठाणे सुरू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र, पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज जिल्ह्यातील शनिवार आणि रविवारची संचारबंदी रद्द केली असल्याचे सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना आढावा बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यामुळे अकोलेकर आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
एक मार्चपर्यंत लागू होती संचारबंदी..
अकोला जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. दररोज चारशेच्या वर रुग्णांची संख्या नोंदवही वर येत होती. परिणामी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यामध्ये संचारबंदीचे आदेश दिले. ते 23 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद राहण्याचे त्यांनी आदेशात म्हटले होते. परंतु, बिगर जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी या आदेशाला विरोध दर्शवित प्रशासनाला निवेदन दिले. तसेच सर्वच प्रतिष्ठाणांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत सर्वच व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली. ही परवानगी देताना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यवसाय करावा. त्यासोबतच प्रत्येक दुकानदाराने व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कोरोना टेस्ट करून घेण्याची आदेशही दिले होते.