अकोला - पोहायला गेलेल्या २ बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्या दोन्ही मुलांचे मृतदेह आज दुपारी (रविवारी) बाहेर काढण्यात आले आहेत. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे शनिवारी सांयकाळी ही घटना घडली होती. रोहित विनोद वानखडे (१२) आणि देवा गजानन वानखडे (११) अशी मृत बालकांची नावे आहेत.
अकोला : शेततळ्यात बुडालेल्या 'त्या' दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले - shettale
रोहित व देवा हे दोघे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गावालगतच्या एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते.
रोहित व देवा हे दोघे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गावालगतच्या एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. रात्री उशीरापर्यंत दोघे घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली होती. यावेळी दोन्ही बालकांचे कपडे व चपला शेततळ्याच्या काठावर आढळून आल्या होत्या. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. तरबेज पोहणाऱ्यांनी तळ्यात दोघांचा शोध घेतला; परंतु त्यांना यश आले नाही.
मुलांचा शोध घेण्यासाठी पिंजर येथील आपात्कालीन बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते. अखेर रविवारी दुपारी दोन्ही बालकांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ठाणेदार विकास देवरे व नायब तहसिलदार सुरळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.