अकोला : हरवलेल्या मुलांच्या एखाद्या वाक्यावरून त्याच्या घराचा पत्ता कसा लागतो याचा अनुभव अकोल्यामध्ये बालकल्याण समितीला आला आहे. 25 सप्टेंबरला अकोला रेल्वे स्थानकावर सापडलेल्या 14 वर्षीय बालकाच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न जिल्हा बालकल्याण समिती करीत होती. परंतु त्यांना यश आले नाही. मुलांना संत्रे खाऊ घालत असताना त्या बालकांने हमारे नागपुर की संत्री प्रसिद्ध है असे म्हटल्यानंतर त्याच्या नेमक्या राहण्याच्या शहराचा पत्ता बालकल्याण समितीला लागला. त्यावरून समितीने नागपूर येथील बालकल्याण समितीशी संपर्क साधला. परंतु, त्या बालकाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात अपयश आले. शेवटी नागपूरमधील विविध जागांची माहिती विचारत त्या बालकाने या परिसरात राहत असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हा बालकल्याण समितीने त्या बालकाच्या आई वडिलांचा शोध लावला व शेवटी त्याला त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. बालकल्याण समितीच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
संत्रीमुळे आई-वडिलांचे वात्सल्य पुन्हा मिळाले : हकीकत अशी की, नागपूर येथून हरवलेल्या एका १४ वर्षीय बालकाला संत्रीमुळे आई-वडिलांचे वात्सल्य पुन्हा मिळाले. अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी मुलाला त्याचे पालक भेटले. हरवलेल्या मुलाला पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. अकोला रेल्वेस्थानकावर २५ एप्रिल रोजी १४ वर्षीय बालक आढळला होता. चाईल्ड लाईनच्या चमूने या बालकास विचारपूस केली, मात्र तो काही सांगण्यास तयार नव्हता. केवळ घरी जायचे नाही असे वारंवार सांगत होता. त्याच्या बोलीभाषेवरुन तो हिंदी भाषिक असल्याचे लक्षात आले. या बालकाचे कुटुंब शोधण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू करण्यात आले.