अकोला - राज्यभरातून महाबीजचे बियाणे उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. अकोला जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. महाबीजच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत आपली जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे या तक्रारींची चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षकांनी तालुका कृषी समितीला दिले आहेत. या चौकशीनंतर महाबीज जिल्हा व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना बियाणे बदलून द्यावे, असे आदेश जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिले आहेत.
अकोला जिल्ह्यामध्ये 1 लाख 60 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 86 हजार हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. पेरणीसाठी महाबीज सोबतच खासगी कंपन्यांचेही बियाणे वापरले गेले आहे. पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत आहेत. जिल्ह्यातील 320 हेक्टर क्षेत्रातील शेतकऱयांनी अशी तक्रार केली आहे. 419 शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रारी केल्या आहे. यातील १९२ तक्रारी महाबीज विरोधात आल्या आहेत.