अकोला- गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला आहे. डोंगराळ भागात तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. आजही अकोल्यातील काही ग्रामीण भागात पावसाची हजेरी लागली आहे. पातूर तालुक्यातील तांदळी, चिखलगाव, शिर्ला, भंडाराज बुद्रुक आदी गावांमध्ये पेरणी सुरू झाली आहे. आज अनेक शेतकऱ्यांनी या परिसरात पेरणी केली. या परिसरामध्ये कपाशीही मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी कपाशीला पेरण्यास सुरुवात केली आहे. पेरणीयुक्त पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच सोयाबीन व कपाशीला पर्यायी पिके घेण्याचे आवाहनही केले आहे.
अकोल्याच्या पातूरमध्ये काही गावांमध्ये पेरणीला सुरुवात, कपाशीवर शेतकऱ्यांचा जोर; घाई नको, कृषी विभाग आठ दिवसांत टप्प्याटप्प्याने जोरदार पाऊस
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानूसार यावर्षी पाऊस हा लवकर आणि चांगला पडणार असल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांच्या अवधीमध्ये टप्प्याटप्प्याने जोरदार पाऊस पडलेला आहे. अकोला शहरामध्ये तर जवळपास 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी यासह मुर्तीजापुर आणि बाळापुर या ठिकाणी चांगला पाऊस पडलेला आहे.
शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात
डोंगराळ भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या परिसरातील शेती ही पेरणीयुक्त झाली आहे. पातूर तालुक्यातील चिखलगाव, शिरला, तांदळी, भंडाराज यासह आजूबाजूच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.
बैलजोडीची पूजा करून पेरणीला सुरुवात
भंडाराज बुद्रुक येथील सम्राट तायडे यांच्या शेतामध्ये त्यांनी कपाशी पेरण्यास सुरुवात केली आहे. सकाळी त्यांनी बैलजोडीची पूजा करून पेरणीला सुरुवात केली. या परिसरामध्ये जवळपास 30 शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात झाली असल्याची माहिती सम्राट तायडे यांनी दिलेली आहे.
शेतकऱ्यांकडून पावसाचा अंदाज घेऊन पेरणी
दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पेरणीनंतर पाऊस आणखीन पडण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे. परिणामी, या शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणीला सुरुवात केली आहे. बऱ्याच भागामध्ये तर सोयाबीनही शेतकऱ्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असलेले सोयाबीन आणि कपाशीला काही ग्रामीण भागात पेरणीला सुरुवात झाली आहे.
'शेतकऱ्यांनी सोयाबीनवर जोर न देता इतरही पिकांना पसंती द्यावी'
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी शेतकऱ्यांना शंभर मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच तसेच जमिनीमध्ये चांगला ओलावा आल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन केले आहे. तसेच पेरणी करताना शास्त्रोक्त पद्धतीने पेरणी करून भरघोस उत्पन्न घ्यावे व सोयाबीन सोबतच इतरही पिकांना शेतकऱ्यांनी पसंती द्यावी. यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला असला तरी पुढच्या वर्षी तो भाव मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनवर जोर न देता इतरही पिकांना पसंती द्यावी, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.
हेही वाचा -नंदुरबार : लाखो रुपयांच्या बाईक ॲम्बुलन्स पडल्या धूळखात