अकोला- कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत असताना गुजरातमधून अनेक मजुरांना ट्रकमध्ये कोंबून आणल्याचा प्रकार मूर्तिजापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. दोन ट्रकमधून १०८ लोकांना कोंबून त्यांच्या गावाकडे नेण्यात येत होते. मात्र, कारंजा रोडवर पकडलेल्या या मजुरांना अलगीकरणात आश्रयित ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांना त्यांच्या घरी रवाना करण्यात आले.
कोरोनाचा धसका; गुजरातमधून ट्रकमध्ये कोंबून आणलेल्या मजुरांना प्रशासनाने दाखवला 'घरचा रस्ता'
मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ट्रकचा पाठलाग करुन बिडगाव फाट्यावर पकडले होते. यावेळी ट्रकमध्ये गुजरातमधून आलेल्या १०८ मजुरांचा समावेश होता.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरी एका ठिकाणाहून दुसरीकडे शेकडो लोक चोरुन एकत्र प्रवास करत आहेत. संचारबंदी दरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका ट्रकचा पाठलाग करुन बिडगाव फाट्यावर पकडले होते. अहमदाबादेतील दोन ट्रक ( क्रमांक एमएच ४० बीएल ०४०१ ) व ( एमएच ४० बीए ५७५६ ) यामध्ये महिला व बालकांसह १०८ लोकांना एकत्र कोंबून कारंजा, दिग्रस, नेर, दारव्हा, मंगरूळपीर, मानोऱ्याकडे नेत असल्याचे उघड झाले होते.
पोलीस हवालदार गजानन झोपे व अश्विन चव्हाण यांनी दोन्ही ट्रक पकडले होते. कोंबून आणलेल्या मजुरांना आश्रयीत अलगीकरण म्हणून निवासाची व्यवस्था दहातोंडा येथील आश्रम शाळेत करण्यात आली होती. त्याच ठिकाणी त्यांची तपासणी सुद्धा करण्यात आली होती. दरम्यान त्यांचा अलगीकरण कालावधी संपुष्टात आल्याने त्यातील १०४ लोकांची १९ एप्रिलला सुटका करुन स्कूल बस व काही खासगी वाहनाने नेर, दारव्हा, मंगरुळपीर, दिग्रस मानोरा, कारंजा या गावी घराकडे रवानगी करण्यात आली. तसेच उर्वरित ४ लोकांना २१ एप्रिलला घरी पाठविण्यात येणार आहे. यात २ ट्रकचालक व एका क्लिनरचा समावेश असून तिघेही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर एक व्यक्ती अचलपूर येथील रहिवासी असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.