अकोला -कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने दुचाकीवर डबलसीट जाणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले आहे. या आदेशामुळे कोरोना पसरण्यास प्रतिबंध लागेल, असा कयास प्रशासनाने लावला आहे. मात्र, शहर वाहतूक शाखेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे आधीच मनोधैर्य खालावलेले असताना त्यात ही कारवाई पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. तर नागरिकांसाठीही अन्यायकारक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतलेला तुघलकी आदेश मागे घ्यावा, अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
अकोल्यात डबलसीट जाणाऱ्यांवर कारवाई राज्यात गेल्या दोन महिन्यापासून संचारबंदी आहे. संचारबंदीच्या काळामध्ये वाहने बाहेर निघाली. त्यांच्यावर शहर वाहतूक शाखेने कारवाईही केली. मात्र, जिल्हा सध्या रेड झोनमध्ये असतानाही पूर्णतः संचारबंदी न ठेवता शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक नागरिक दुचाकीवर महत्त्वाच्या कामांसाठी घराबाहेर पडत आहे. अनेकजण दुचाकीवर डबलसीट बसून बाहेर पडत आहेत.
हेही वाचा -कोरोनाचा धसका; बंदिवान देईनात प्रकृती खराब झाल्याची कारणे!
जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना दुचाकीवर डबलसीट जाणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर वाहतूक शाखा कारवाई करीत आहे. मात्र, ही कारवाई करताना शहर वाहतूक शाखेसह नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहर वाहतूक शाखेकडून डबलसीट दिसणारे वाहने जप्त करण्यात येत आहे. वाहनचालकांची एकही कारण ऐकून न घेता ते वाहन थेट शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात येत आहे.
नागरिकांना होतोय त्रास -
नागरिकांची दुचाकी जप्त केल्यानंतर त्याच ठिकाणावरून पायी पायी जावे लागत आहे. शहरांमध्ये सध्या 46 अंश तापमान असताना पाई जाणाऱ्यांना उन्हाचा त्रास होत आहे. शहरातील सिटीबस, ऑटो रिक्षा या व्यवस्था बंद असताना नागरिकांनी घराबाहेर पडताना वाहनाशिवाय एकही साधन नसल्यामुळे डबलसीट जाणे काही कारणास्तव अनिवार्य आहे. बऱ्याच वेळा दुचाकीवर वृद्ध महिला, पुरुष असतो, महिला व पुरुष असतात, बाळाला दवाखान्यात घेऊन जावे लागते, गावातील नागरिकांना सिलिंडर घरपोच मिळत नसल्याने त्यांना दोघे मिळून यावे लागत असताना त्यांच्यावर ही कारवाई होणे हे अन्यायकारक आहे.
दरम्यान, याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना विचारणा केली असता त्यांना त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.