महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात अभाविपचे विविध मागण्यांसाठी कृषी विद्यापीठात ठिय्या आंदोलन - Panjabrao deshmukh agriculture university

कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतु, कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून या सत्राची परीक्षा घेण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३० टक्के कपात करण्यात यावी यासाह विविध मागण्या अभाविपने केल्या.

आंदोलन करताना विद्यार्थी
आंदोलन करताना विद्यार्थी

By

Published : Sep 2, 2020, 5:23 PM IST

अकोला- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने आपल्या विविध मागण्यांसाठी आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांना शिकू द्या, कुलगुरूंनी खुर्ची खाली करावी, अशा घोषणा या वेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या.

आंदोलन करताना विद्यार्थी

कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतु, कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून या सत्राची परीक्षा घेण्यात आलेली आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३० टक्के कपात करण्यात यावी, कृषी तंत्रनिकेतन पदविकेतून बीएससी कृषीमध्ये थेट तिसऱ्या सत्रात प्रवेशित विद्यार्थ्यांना सत्र परीक्षेकरिता ४० पेक्षा जास्त श्रेयांक देण्यात यावे, अथवा तिसरे, चौथे, पाचवे व सहावे नियमित सत्र वगळून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, म्हणजेच सातव्या सत्रापर्यंत अतिरिक्त श्रेयांकावर भार देण्यात यावा, पुनर्मुल्यांकनाचे गुण वाढवून आल्यास किंवा उत्तीर्ण झाल्यास भरलेला शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात यावा आणि पुनर्मुल्यांकनाचे शुल्क विद्यार्थ्यांना भरणे सोयीचे होईल इतके कमी करण्यात यावे.

तसेच, शेतकरी पुत्रांना दिलासा द्यावा. याकरिता स्वतंत्र यंत्रणाच कार्यान्वित करावी. गेल्या ५ महिन्यापासून कोरोना महामारीमुळे वसतिगृह केअर सेंटर म्हणून देण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात जितके दिवस वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नव्हते, तेवढ्या काळाचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे. शिष्यवृत्तीचा दुसरा हप्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावा, यासह आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

त्याचबरोबर, जोपर्यंत कुलगुरू स्वतः येऊन बोलत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून आमच्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्या, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसोबत बोलण्यासाठी आलेले अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी जोपर्यंत कुलगुरू येत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे या दोन्ही पक्षांची चर्चा शेवटी निष्फळ ठरली. त्यानंतर, कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात अभिषेक देवर, विराज वानखडे, पुष्कर देव, आदी उपस्थित होते.

हेही वाचा-सर्वोपचार रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा लागत नाही शोध; मोठ्या भावाने दिला आत्मदहनाचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details