अकोला - जिल्ह्यातील पातूरच्या 'किड्स पॅराडाईज' शाळेत मंगळवारी विद्यार्थ्यांचा सत्ता स्थापनेचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत लोकशाहीचे धडे गिरवण्याचा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील पातूरच्या किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूलमध्ये राबविण्यात आला. नुकतेच शालेय मंत्रिमंडळासाठी येथे निवडणूक पार पडली. या निवडणुकीत उमेदवार, बॅलेट पेपर आणि निवडणूक जिंकल्यानंतरचा जल्लोषही होता. तर, त्यानंतर सत्ता स्थापनेचा शपथविधी सोहळाही पार पडला. या शालेय मंत्रिमंडळाच्या सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रीही होते.
या शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीत एकूण ८३ उमेदवार रिंगणात उभे होते. त्यापैकी १६ उमेदवार विजयी झाले, ९ मते अवैध झाली आणि ७ जणांनी नोटा या मतांचा वापर केला. त्यामध्ये श्रावणी खरडे, यश महल्ले, गार्गी ढोकणे, तन्मय महोकार, आनंद राठोड, गौरी इंगळे, सायली खेडकर, श्रेयश बगाडे, योजना उगले, हर्षल वानखडे, सिद्धी पाकदुने, अनिकेत घोरे, खुशी राठोड, अनिकेत ढाळे, गौरव बंड, गायत्री पेंढारकर आदी विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यावेळी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी सत्कार केला. निवडून आलेल्या उमेदवारांमधून शालेय मंत्रिमंडळ तयार करण्यात आले. या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा संविधान दिनाचे औचित्य साधून उत्साहात पार पडला.