अकोला -जुना भाजीबाजारातील फरसाण दुकानांना आज(रविवार) पहाटे साडेचार वाजता आग लागली. या आगीमुळे दुकानांमागील घरानेही पेट घेतला. पाच दुकानांतील तेल जळल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 20 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
जुना भाजीबाजारात सिंधींची फरसाण दुकाने आहेत. याच दुकानांवर फरसाणचा कारखाना आहे. पहाटे या दुकानातून धूर निघत होता. त्यापाठोपाठ आगही दिसू लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण करून पाच दुकानांना आणि बाजूच्या घरालाही आपल्या कवेत घेतले. ही आग इतकी भयंकर होती की, तिच्यामुळे संपूर्ण बाजाराला आग लागल्यासारखे दृश्य निर्माण झाले होते.