अकोला - कानशिवणी जवळून वाहणाऱ्या काटेपुर्णा नदी पात्रांमध्ये कानशिवणी येथील एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पिंजर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
अकोला : अंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू, कानशिवणी येथील घटना - पिंजर पोलीस ठाणे
पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळीसाठी गेलेल्या एका 17 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्रतीक वाघमारे, असे त्याचे नाव आहे.
बार्शीटाकळी तालुक्यामधील पिंजर पोलीस ठाण्यांंतर्गत येत असलेल्या खांबोरा येथील प्रकल्पाजवळील एमआयडीसी विहिरीलगत असलेल्या काटेपुर्णा नदीमध्ये कानशिवणी येथील प्रतीक अरुण वाघमारे (वय 17 वर्षे) हा नदीच्या पात्रामध्ये आंघोळीसाठी गेला होता. नदीपात्रामधील पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस जमादार महादेव साळुंके, ज्ञानेश्वर राठोड यांनी पोलीस पाटील दिगंबर छबिले यांच्या उपस्थितीत घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी पिंजर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे गावांमध्ये पसरली आहे. पुढील तपास पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार महादेव साळुंके, ज्ञानेश्वर राठोड हे करत आहेत.
हेही वाचा -अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त