अकोला -शहरातील मोडकेवाडी परिसरात एका कथित मौलानाने 7 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. आऱोपीला जुने शहर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बजाविले आहे. या घृणास्पद घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोडकेवाडी परिसरातील रहिवासी मौलाना मोहम्मद रिजवान अब्दुल शकूर (26) याने त्याच भागातील 7 वर्षीय चिमुकलीला थांबून तिला जवळ घेतले. 'तू कुठल्या मदरशात शिक्षण घेते', असे विचारणा करून तिच्या अंगाला स्पर्श करून हात धरून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. चिमुकलीने आरडाओरडा केल्यानंतर तिची आई, वडील आणि काकांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोहम्मद रिजवान अब्दुल शकूरविरुद्ध भादवि कलम 354 तसेच पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच न्यायालयात रात्री हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बजावले. ही कारवाई ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.