अकोला - इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या व शहरात येऊन गेलेल्या त्या दोन कोरोनाबाधित पाहुण्यांच्या संपर्कात अकोल्यातील नातेवाइक आले होते. यातील काहींचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान बाधितांच्या संपर्कातील 6 नातेवाइकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.
नागपूरमध्ये उपचार सुरू
इंग्लंड प्रवास करून अकोल्यात येऊन गेलेले दोन पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. संबंधितांना नवीन कोविड विषाणूची लागण झाली का, हे पाहण्यासाठी यांच्या स्वॅबचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी नागपूर महापालिका प्रशासनाने दिली. रविवारी १३ डिसेंबरला अकोल्यात पोहोचलेले हे पाहुणे सोमवारी २१ डिसेंबरला नागपूरला गेल्यानंतर तेथे तपासणीत ते कोविड बाधित आढळले. त्यानंतर त्यातील एकाच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती
जनुकीय रचनेत बदल झालेल्या नवीन कोविड विषाणूची सध्या जगभरात दहशत असून, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग सतर्क आहे. नवीन कोविड विषाणूचा वाहक पाहुण्या रुग्णाला नवा स्ट्रेन आढळल्यास पॉझिटिव्ह रुगांच्या नातेवाइकांच्या स्वॅबचे अहवाल तपासणीसाठी पुण्याला पाठविले असल्याचे, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले.