अकोला - शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना तपासणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात नऊ ठिकाणी शिक्षकांच्या कोरोना तपासण्यात करण्यात आल्या. यावेळी 35 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यासंबंधीचा दुजोराही शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे शाळांची घंटी वाजण्यासंदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली असून या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सरकारी अनुदानित तसेच खासगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि त्याचे वर्ग 23 नोव्हेंबरला सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. पण, शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक स्तरावर सोपण्यात आला आहे. त्यासोबत शाळेत येणाऱ्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या करण्याचे आदेश सुद्धा शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणी शिबिरात काही शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. परिणामी काही पालकांनी काेराेनावर लस आल्याशिवाय शाळा सुरू न करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनसुद्धा सावध झाले असून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत.