अकोला- प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार करून खून केलेल्या 3 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या तपासासाठी अमरावती पोलीस महानिरीक्षक यांनी तपास लावणाऱ्या पथकास 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पवन सैदानी, शाम उर्फ स्वप्नील नाठे, अल्पेश दुधे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 1 महिना 5 दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर अकोट शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून 21 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर हे काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडले. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यावेळी घटनास्थळी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 2 काडतुसे आढळली होती.