अकोला - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. तसेच त्यांनी शहरातील ठिकाणे हे कोरोना प्रसार करण्यासाठी अग्रेसर असल्याचे सांगत तिथे हॉटस्पॉट करून याठिकाणीच रॅपिड आणि अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेशही दिले आहेत. आज (मंगळवारी) सकाळच्या सत्रातील अहवालात 156 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.
रुग्णसंख्या कमी होण्यासाठी प्रयत्न -
शासकीय कार्यालयात कोरोना प्रतिबंध उपाय योजना प्रभावी पणे राबविल्या जातात किंवा नाही हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटारिया, मनपा आयुक्त मीरा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी मुद्रांक शुल्क विभाग येथे जाऊन तेथील कोरोना प्रतिबंधक उपाय योजनाचा आढावा घेतला. त्यानंतर आरोग्य विभागाकडून तिथेच रॅपिड अँटिजेंट टेस्ट करण्यास सुरुवात केली. जेणेकरून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींवर तातडीने उपचार सुरु होतील. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खासगी कोरोना केंद्र किंवा होम आयसोलेशन या सर्व गोष्टीवर निर्णय घेऊन त्यांना उपचार लवकरात लवकर मिळावा आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावी, या उद्देशाने हा प्रयोग जिल्हाधिकारी यांनी सुरू केला आहे. यासाठी 29 कोरोना पॉझिटिव्ह हॉटस्पॉट ठरविण्यात आले असून त्याठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.