अकोला - कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही कोरोनाबाधित होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. सर्व कोरोनाबाधित प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25 प्रशिक्षणार्थी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह - अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोरोनाबाधित डॉक्टर
राज्यात आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अकोला शासकीय महाविद्यालयामध्ये तर २५ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना कोरोना झाला आहे. यामध्ये प्रथम व द्वितीय वर्षामधील एकूण 25 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रकारामुळे महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी लगेच बाधित विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले आहे. प्रथम वर्षातील 17 आणि द्वितीय वर्षातील आठ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोना काळानंतर आता शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. एमबीबीएस प्रथम वर्षातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालय सुरू झाले आहे. त्यात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याने या विद्यार्थ्यांना फारच काळजी घ्यावी लागणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने सर्वच विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करून घेतली आहे. उर्वरित सर्व विद्यार्थी निगेटिव्ह आले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालय बंद न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.