अकोला -जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि अकोलेकरांमध्ये चिंता वाढली आहे. शनिवारी सायंकाळी ते सोमवारी पहाटेपर्यंत 24 तास संचारबंदी करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यानंतरही संचारबंदी वाढवण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.
बेजबाबदार नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश पोलीस प्रशासन, महसूल विभाग, महापालिका विभाग आणि आरोग्य विभागाला दिले आहेत.
- कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना राज्य सरकारने कोरोना प्रतिबंध नियमांना धरून व्यवहार सुरू करण्याची परवानगी दिली आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंध नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्यामुळे अचानकपणे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
- दररोज शंभर ते दीडशे रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या परत वाढत असल्याने कोविड सेंटर्स आणि शासकीय कार्यालये व विद्यार्थी वसतिगृह ताब्यात घेतले आहे. हे स्थळ परत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
- विशेष म्हणजे, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि महसूल विभागाने दोन ते तीन दिवस सतत मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, परिस्थिती 'जैसे थे' असल्याने ही कारवाई अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.
- गर्दीची ठिकाणी कोरोना पसरू शकतो यासाठी लक्ष जिल्हा प्रशासनाने अशी 29 ठिकाणे शोधली आहेत. तिथे आरटीपीसी आणि रॅपिड टेस्ट घेण्यासाठी फिरते आरोग्य पथक कार्यान्वित केले आहे. या पथकद्वारे गर्दीच्या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
- बरेच रुग्ण हे कोरोना पॉझिटिव आल्यानंतर ते होम आयसोलेशनमध्ये राहत आहेत. परंतु, ज्या रुग्णांची घरातील खोलींची संख्या कमी आहे किंवा जे रुग्ण एकाच खोलीत परिवारासह राहत आहेत, अशा रुग्णांना कोविड सेंटर्स किंवा विलगीकरण कक्ष यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत.
- कोरोना बाधित रुग्णाच्या जवळपासच्या राहणाऱ्या शंभर ते दीडशे लोकांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
- लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये 50 पेक्षा जास्त संख्येने नागरिक उपस्थित असतील त्यांच्यावर ही आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याची जबाबदार म्हणून सभागृह संचालक किंवा मालकाला दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे हा कार्यक्रम आहे, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.