अकोला- जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शालेय तथा नवजात बालकांच्या हृदयासंदर्भातील असलेल्या आजारांची तपासणी करण्यासाठी आज जिल्ह्यातील १८ मुलांना मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यातून आतापर्यंत ३१ बालकांना पाठविण्यात आले असून उर्वरित १५ बालकांना २१ जानेवारीला उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येईल. त्यानंतर अकोला जिल्हा हा बालकांच्या हृदयातील आजारातून मुक्त होणारा जिल्हा ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. लहान बालकांच्या हृदयात छिद्र असणे व त्यावर उपचार करण्यासाठी पालकांकडे पैसा नसल्यामुळे अनेक बालकांचा उपचाराअभावी मृत्यू होतो. अशा बालकांवर पैशाअभावी असा प्रसंग ओढवू नये म्हणून आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अशा बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांची माहिती गोळा केली जाते. त्यानंतर बालकांना उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात येते. त्या बालकांसह त्यांच्या आई-वडिलांचीही मोफत सर्व व्यवस्था आरोग्य विभागातर्फे करण्यात येते.