अकोला -गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत हळुहळू वाढ होत आहे. तरी बहुतांश रुग्ण हे निवास विलगिकरणमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील डेडिकेटेड रुग्णालयातील 85.69 टक्के खाटा रिक्त आहेत. या प्रक्रियेमुळे कंत्राटी पध्दतीने घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले आहे.
अकोला कोविड केंद्र तात्पुरती बंद कोविडच्या रुग्णांना प्रभावी उपचार मिळावा या अनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयासह इतर शासकीय व खासगी अशी 13 रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली होती. यामध्ये चार शासकीय, नऊ खासगी रुग्णालय आणि हॉटेल्सचा समावेश आहे. अधिग्रहित रुग्णालयांमध्ये 839 खाटा रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ 120 खाटांचा वापर कोविड रुग्णांसाठी केला जात आहे. तर उर्वरित 719 खाटा रिक्त आहेत. यामध्ये ऑक्सिजनसह खाटांचाही समावेश आहे. म्हणजेच एकूण खाटांच्या तुलनेत केवळ 14.31 टक्के खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. तर बहुतांश रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना निवास विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परिणामी 85.69 टक्के खाटा रिक्त आहेत.
सूचना न देता काढून टाकले
दरम्यान, कोविड केंद्रात काम करण्यासाठी तात्पुरत्या पध्द्तीने कंत्राटी कर्मचारी यांना नोकरी देण्यात आली होती. सुरवातीला तीन महिने व नंतर तीन महिने असे जवळपास 200 जणांना काम देण्यात आले आहे. परंतु, आता जिल्ह्यातील 14 कोविड केंद्र बंद पडल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, हे कर्मचारी आम्हाला परत नोकरीवर घ्यावे अशी मागणी करत आहेत.
हेही वाचा -अबब...! नागपूर जिल्ह्यातील ४१ शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
दोन ऑक्सीजन टॅंक प्रलंबित
कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून सर्वोपचार रुग्णालयातच जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मुर्तीजापूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दहा केएल क्षमतेचे ऑक्सिजन टँक प्रस्तावित होते. त्यापैकी सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सीजन टॅंक बसविण्याचे काम पूर्ण झाले असून ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची कामे अद्यापही प्रलंबित आहेत.
हेही वाचा -मंत्री, राजकीय नेत्यांना विनंतीची चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या..!